डोळ्यांचे आजार, प्रमुख लक्षण आणि उपचार

डोळ्यांचे आजार, प्रमुख लक्षण आणि उपचार

दृष्टीदोष

दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते. डोळयाच्या बाहुलीतून प्रकाशकिरण आत शिरून भिंगातून एकत्र होतात. यामुळे आतल्या पडद्यावर वस्तूची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला दृष्टीज्ञान होते. जेव्हा प्रकाशकिरण आंतरपटलाच्या मागे किंवा पुढे एकत्रित होतात तेव्हा दृष्टीदोष होतो. डोळयाची बाहुली आणि पडदा यांमधले अंतर कमीजास्त असेल तर प्रतिमा पडद्यावर अचूक व स्पष्ट पडत नाही. अशा वेळेला चष्मा वापरून (भिंग) हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते.

 

1.लघुदृष्टी

सर्वसाधारणपणे लहान वयात येणारा दृष्टीदोष लघुदृष्टी प्रकारचा असतो. म्हणजे जवळचे दिसते पण लांबचे कमी दिसते या स्वरुपाचा हा दोष असतो. याचे कारण म्हणजे हा नेत्रगोल लांबट अंडाकृती असतो. त्यामुळे लांबची चित्रप्रतिमा नेत्रगोलाच्या आतल्या नेत्रपटलावर पोचत नाही म्हणून धूसर दिसते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर जास्त असणे हे याचे कारण असते. यामुळे मुले पुस्तक जवळ धरतात. मुलांना फळयावरचे नीट दिसत नाही. मुलाला ही अडचण नेमकी न सांगता आल्यामुळे वर्गात बोलणीही खावी लागतात. (घरात टी.व्ही. असल्यास मूल टी.व्ही. जवळ बसून बघते.)

2.दीर्घदृष्टी

दीर्घदृष्टी म्हणजे लांबचे दिसते पण ‘जवळचे कमी दिसते’ या स्वरुपाचा हा दोष असतो. या दोषामध्ये वस्तुपासून निर्माण होणारी प्रतिमा आंतरपटलामागे तयार होते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर कमी असणे हे याचे कारण असते. (याचे कारण म्हणजे नेत्रगोल थोडा चपटा असतो.) यामुळे वाचताना त्रास होणे, डोळे चोळणे, वाचताना कपाळावर आठया, तिरळे पाहणे, इ. त्रास होतो. सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो. सर्व मुलांची डोळयांची तपासणी (यंत्राने) करणे आवश्यक आहे. यावर वेळीच उपाय न झाल्यास मोठेपणी चष्मा देऊनही दृष्टी सुधारत नाही. चाळिशीनंतरच्या दृष्टीदोषात लांबचे नीट दिसते, पण जवळचे दिसण्यासाठी (धान्य निवडणे, वाचणे, शिवणे) चष्मा वापरावा लागतो

 

3.बुबुळ वक्रता (Astigmatism)

– बुबुळ वक्रतेमधील होणा-या बदलामुळे स्पष्ट दिसत नाही. यात डोळयामध्ये स्पष्ट प्रतिमा कोठेच निर्माण होत नाही. या विकारावर भिंग म्हणजे चष्मा लावावाच लागतो.

 

दृष्टीदोषाची लक्षणे

डोळयांवर ताण पडल्याने डोके दुखते. (ही डोकेदुखी कपाळावर दोन्ही डोळयांच्या मधल्या भागात येते). फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे. फळा किंवा टी.व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे. वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे. जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे. जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे. तिरळेपणा दिसणे. डोळे किंवा डोकेदुखी. सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो. दृष्टीदोषावरील उपचार दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा वापरावा लागतो. लहान वयात येणा-या या दृष्टीदोषावर योग्य प्रकारचे भिंग (चष्मा) वापरून दृष्टी सुधारता येते. वयाच्या 15व्या वर्षानंतर यासाठी योग्य कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येईल. यासाठी नेत्रतज्ज्ञ मदत करतील. कॉन्टॅक्ट लेन्सचे अनेक प्रकार आहेत. यात सॉफ्ट (लवचिक) आणि सेमी सॉफ्ट (अर्ध लवचिक) असे मुख्य प्रकार आहेत. हल्ली यात अगदी अल्प किमतीत महिनाभर वापरून झाल्यावर टाकून देण्याचे (डिसपोझेबल्स) कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध आहेत. लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीवर लेसर किरणोपचार करून बुबुळाचा आकार सूक्ष्मरित्या बदलता येतो. याला ‘लेसिक’ असे नाव आहे. या उपचाराने चित्रप्रतिमा नेत्रपटलावर आणता येते. यामुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या ऐवजी डोळयाचा नंबर दुरुस्त करता येतो. ही शस्त्रक्रिया 18च्या वयानंतरच केली जाते. मात्र ही पध्दत पूर्णपणे निर्धोक नाही. यातून बुबुळाच्या आकार-वक्रतेचा फरक एकदा झाला की तो बदलता येत नाही.

 

मोतीबिंदू (Cataract)

मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो. मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो. मधुमेहात तो लवकर येऊ शकतो. मोतिबिंदूची लक्षणं मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. रात्री गाडी चालवतांना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो. दिव्याभोवती रंगीत कडी दिसतात. डोळयांसमोर काळे वर्तुळ दिसते. दिवसा (जास्त प्रकाशात) कमी दिसते. पण संध्याकाळी (कमी प्रकाश असतो तेव्हा) दिसण्यात थोडी सुधारणा होते, एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसणे हे पण एक लक्षण आहे. कालपरत्वे दूरच्या आणि जवळच्याही वस्तू दिसणं बंद होतं. म्हणजेच मोतिबिंदू पिकतो. जास्त पिकल्यास काचबिंदूही होऊ शकतो. मोतीबिंदू किती पिकला आहे यावर तक्रारींचे स्वरूप अवलंबून असते इत्यादी. मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही. तसेच उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. प्रमुख कारणं
१. वाढत्या वयानुसार नैसर्गिक भिंगातील प्रथिनांमध्ये बदल होऊन ते अपारदर्शक होतात.
२. डोळ्यांना इजा झाल्यास.
३. डोळ्यांच्या इतर आजारांमुळे.
४. स्टेरॉइडसारखी औषधं दीर्घकाळ वापरल्यामुळे.
५. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये मोतिबिंदू लवकर होतो.
६. काही रुग्णांना जन्मतः मोतिबिंदू असतो.

 

मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery)

मोतिबिंदू कोणत्याही औषधाने अथवा चष्मा वापरून कमी होत नाही. शस्त्रक्रिया हाच एकमेव कायमस्वरूपी उपचार आहे. यात अपारदर्शक भिंग काढून कृत्रिम भिंगारोपण केलं जातं. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत. साधी टाक्याची पध्दत (Small incision cataract surgery) यात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके किंवा जखम भरायला थोडे दिवस लागतात. बिनटाक्याची ‘फेको’ पध्दत (Phacoemulsification) फेको शस्त्रक्रिया मोतिबिंदू रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. थेंबाचे औषध घालून भूल देऊन ही शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ती सुरक्षित ठरते. ही शस्त्रक्रिया टाके व वेदनाविरहित असते. डोळे लाल होणं, पाणी येणं, वेदना होणं हा त्रास नसतो, यामध्ये छेद फक्त 2.5- 3.5 ि.मी.चा असतो. यात एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. यामुळे मोतीबिंदू लहान छेदातून काढता येतो. मोकळया जागी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व ते आत उघडते. या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत. यात आत आणखी नवीन उपकरणे आली असल्याने छेद आणखी थोडा लहान झाला आहे. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. सर्व वयोगटातील रुग्णांना ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. रुग्ण त्वरित घरी जाऊ शकतो आणि 9-10 दिवसांत कामाला लागू शकतो. या शस्त्रक्रियेनंतर दृष्टीची गुणवत्ता अप्रतिम असते.

 

कृत्रिम भिंग (IntraocularLens)

हे भिंग म्हणजे एक वरदानच आहे. हे उच्च प्रतीच्या प्लास्टिकचे बनवतात. यात अनेक प्रकार आहेत. त्यातल्या आधुनिक प्रकारांमुळे नैसर्गिक भिंगाच्या सारखी लवचीकता आली आहे. यामुळे आता लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीसाठी वापरावा लागणारा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची गरज राहत नाही. मूळ दृष्टीदोषाचा विचार करून हे कृत्रिम भिंग निवडले जाते.

 

काचबिंदू (Glaucoma)

काचबिंदूमध्ये डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हला इजा पोहोचते आणि दृष्टी जाते. जसा रक्तदाब असतो, तसाच डोळ्यातील द्रवाचाही दाब असतो. काचबिंदूमध्ये डोळ्यांचा दाब जास्त असतो. पण काही वेळा काचबिंदू असूनही डोळ्याचा दाब कमी किंवा साधारण आढळला आहे. डोळ्यात अधिकचा द्रवपदार्थ तयार झाला किंवा द्रव वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना इजा झाली तर हा आजार होऊ शकतो. यात डोळ्यांत उच्च दाब निर्माण होतो व त्याचा परिणाम ऑप्टिक नर्व्हवर होतो आणि मग दृष्टी गमवावी लागू शकते. काचबिंदू 40 वर्षांवरील कुणाही व्यक्तीला होऊ शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबात कुणाला काचबिंदू असेल तर या आजाराची शक्यता जास्त असते. मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्यांनाही तो होऊ शकतो. इतकेच नव्हे तर लहान मुले आणि कधी नुकत्याच जन्म झालेल्या मुलांमध्येही हा आजार आढळतो. काचबिंदू तपासण्याच्या वेगवेगळ्या चाचण्या आहेत. संबंधित रुग्ण विविध अंतरांवरील किती व्यवस्थित पाहू शकतो, बाजूचे दिसण्याची क्षमता, डोळ्यातील दाब आणि रेटिना व ऑप्टिक नर्व्ह यांची तपासणी करून काचबिंदूचे निदान करतात. या आजारात तुमची परिघीय दृष्टी, तुम्हाला जाणीव नसताना हळूहळू नाहीशी होऊ शकते. म्हणजे तुम्हाला माहीत नसताना हा आजार तुमच्या दृष्टीची चोरी करीत असतो. हा दृष्टिचोर आजार आहे काचबिंदू बरा होऊ शकतो का? तर दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. काचबिंदूमुळे एकदा गेलेली दृष्टी परत येत नाही. विशिष्ट औषध टाकून आहे ती दृष्टी वाचविणे किंवा मग शस्त्रक्रिया करणे हाच काचबिंदूवरील उपाय आहे. डोळ्यांत टाकण्यात येणाऱ्या औषधामुळे दाब नियंत्रित राहतो व वाहिन्यांची हानी होत नाही. पण औषध टाकूनही फारसा उपयोग होत नसेल किंवा औषध टाकण्यात अनियमितता असेल तर शस्त्रक्रिया करणेच अधिक चागंले. डोळ्यांची नियमित तपासणी आणि त्वरित उपचार याद्वारेच काचबिंदूवर मात करता येते.

 

काचबिंदू कोणाला होऊ शकतो?

आपले वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल. आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल. आपल्या घरात कोणाला आधीपासून काचबिंदू असेल. आपल्याला मधुमेह किंवा रक्तदाब असेल. आपली दृष्टी संकुचित होत असेल. वरील दिलेल्यापैकी कोणताही त्रास होत असेल तर तुम्हाला काचबिंदू असण्याची शक्यता आहे. तुम्ही वेळेवर तपासणी व औषध उपचार न केल्यास कायमची दृष्टी जाण्याचा धोका संभवतो. अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हे एक प्रमुख कारण आहे. डोळ्याच्या आतील दबाव वाढणे व त्यामुळे डोळ्याची मुख्य प्रकाश संवेदना वाहून नेणारी नस खराब होते. ही प्रक्रिया हळूवार होते व यामध्ये रोग्याला विशेष त्रास होत नाही, परंतु नजर कमी झाल्यावर काचबिंदू वरील उपचाराचा फायदा होत नाही. प्रमुख लक्षणे : काचबिंदूमुळे रोग्याला विशेष त्रास होत नसला तरी काही लक्षणे या रोगाची कल्पना देतात. जसे की, वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, आजुबाजूंची नजर कमी होणे, गाडी चालविताना बाजूचे न दिसणे, प्रकाश दिवे भोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे, डोके दुखणे इत्यादी. मधुमेही, वयस्कर व कुटुंबात काचबिंदू असणार्‍यांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी होणे महत्त्वाचे आहे.

 

काचबिंदुचे प्रकार काचबिंदुचे दोन मुख्य. प्रकार आहेत

  • क्रोनिक / दिर्घकालीन काचबिंदु किंवा प्राथमिक ओपन अॅंगल काचबिंदु (POAG)
  • अॅक्‍युट अॅंगल क्‍लोजर काचबिंदु (तिव्र कोन बंद काचबिंदु)

दोन्‍ही प्रकारामध्‍ये कोन (अॅंगल म्‍हणजे डोळयांच्‍या आतमध्‍ये जल निसारणासाठी जो कोन वापरला जातो व जो डोळयातील पाण्‍याचा निचरा नियंञीत करतो. इतर प्रकारामध्‍ये सामान्य-ताण काचबिंदु, वर्णक काचबिंदु, माध्‍यमिक काचबिंदु व जन्‍मजात काचबिंदु यांचा समावेश होतो.

 

प्राथमिक उघडया कोनांचा का‍चबिंदु – हा सामान्य प्रकारचा काचबिंदु हळुहळु इतर लक्षणे न दाखविता आपली सभोवतालची दृष्टी कमी करतो. काही काळानंतर हे लक्षात येते पंरतु कायमस्वरुपी नुकसान आधीच झालेले असते. तर तुमचा ताण उच्च असेल तर या प्रकारच्या काचबिंदु मध्ये डोळयांचा झालेला नाश हा बोगदा दृष्टी निर्माण करतो व तुम्ही सरळ समोर असणा़-या वस्तु फक्त पाहू शकतात.

 

बंद कोनाचा काचबिंदु – बंद कोनाचा काचबिंदुमध्ये काही लक्षणे दिसु शकतात जसे डोळे दुखणे, डोके दुखी, प्रकाश वलय दिसणे, विस्तृत बाहुली, दृष्टी कमी होणे, डोळे लाल होणे, मळमळ आणि उलटी हि लक्षणे काही तास राहतात व नंतर परत दुस-या फेरीत निर्माण होतात. प्रत्येक अटॅक मध्ये अधिकाधिक नुकसान होऊ शकते.

 

सामान्य ताण काचबिंदु– प्राथमिक उघडया कोनाचा काचबिंदु प्रमाणे सामान्य ताण काचबिंदु (ज्याला सामान्य काचबिदु किंवा कमी ताण काचबिंदु अथवा कमी दाब काचबिंदु देखील म्हणतात) हा उघडया कोनाचा काचबिंदु आहे. ज्यामध्ये मज्जातंतुला नुकसान झाल्याने आजुबाजुच्या नजरेची घट होऊ शकते. या प्रकारामध्ये डोळयांचा ताण हा सामान्य पातळीवर राहतो. या प्रकारात बोगदया सारखी दृष्टि जाणवेपर्यंत कुठलीही लक्षणे दिसत नाहीत तसेच वेदना क्वचीत असतात आणि तो पर्यंत डोळयांच्या नसेला (ऑप्टीक नर्व्ह) कायमस्वरुपी इजा पोहोचलेली असते. या प्रकाराच्या काचबिंदु मध्ये कसलेही कारण आजतागायत आढळुन आलेले नाही. परंतु बऱ्याच डॉक्टरांच्या मते डोळयांच्या नसेला अल्प रक्तपुरवठा झाल्यामुळे हा काचबिंदु होतो.

 

पिंगमेटरी काचबिंदु – डोळयांतील कृष्ण मंडळातुन (आयरीस) बाहेर पडणा-या रंगद्रव्यामुळे डोळयांच्या कोनामध्ये कचरा जमा होऊन डोळयातील प्रवाही द्रव्याला बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो व हा दुर्मिळ प्रकाराचा काचबिंदु होतो. कालांतराने अवरोधीत कोनला झालेल्या दाहक प्रतिसाधामुळे डोळयातील प्रवाही जलाचा निचरा प्रणालीला हानी पोहचु शकते. तुम्हाला या प्रकारात बहुतांशी कुठलीही लक्षणे दिसणार नाहीत. कधीतरी थोडी वेदना आणि धुसर नजर व्यामानानंतर जाणवेल. हा काचबिंदु मोठया प्रमाणावर गौरवर्णीय पुरुषांना त्यांच्या वयाच्या तिशीत किंवा चाळीसीच्या मध्यात आढळुन येतो.

 

अनुषंगी काचबिंदु – दिर्घ कालीन काचबिंदुची लक्षणे जर जखमेनंतर झाली असतील तर तो अनुषंगीकाचबिंदु समजतात. हा काचबिंदु जंतु संसंर्ग, दाहक प्रतिसाद, कॅन्‍सरची गाठ, मोतिबिंदुमुळे फुगणारे भिंग इ. कारणांमुळे देखील होऊ शकतो.

 

जन्मजात काचबिंदु – काचबिंदुचा हा अनुवंशीक प्रकार जन्माच्या वेळीच आढळतो या प्रकाराच्या ८० टक्के केसेसचे निदान १ वर्ष वयाच्या आतच होते. हि मुले जन्मताच डोळयातील अरुंद कोन घेऊन किंवा डोळयांच्या निचरा प्रणालीमध्ये काही व्यंग घेऊन जन्माला येतात. जन्मजात काचबिंदुची लक्षणे समजणे अवघड जाते. कारण लहान मुले त्यांना काय होते हे समजत नसल्यामुळे निदान करणे अवघड जाते. जर तुम्हाला ढगाळ, पांढरे, धुसर, वाढ झालेले अथवा बाहेर पडु बघणारे डोळे जर तुमच्या मुलामध्ये आढळु लागते तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. हा काचबिंदु मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आढळतो. सिग्न संकेत व लक्षणे बऱ्याच वेळेस काचबिंदुला हा दृष्टी चोरणारा शांत चोर (“Silent thief of sight“) म्हपटले जाते. कारण बऱ्याच प्रकारात वेदना नसतात वा कसलीही लक्षणे नसतात तो पर्यंत दृष्टीं चा नाश झालेला असतो याच कारणासाठी काचबिंदुचे निदान होत नाही. तोपर्यंत ऑप्टीक नर्व्हची / नजरेची कायमस्व रुपी हानी झालेली असते. .पंरतु तीव्र बंदचा काचबिंदु अचानक काही लक्षणे दिसतात ज्या्मध्ये धुसर दृष्टि, प्रकाशा भोवती वलये, प्रचंड डोळयांच्या वेदना मळमळ आणि उलटया होतात. जर तुम्हायला अशी लक्षणे आढळली तर तुम्हीक त्वचरीत नेञ तज्ञांकडे जा किंवा तात्काळ वैदयकिय सेवा घ्या जेणेकरुन कायमस्वलरुपी दृष्टि जाण्या पासुन तुम्हीं वाचवु शकता. रोग निदान व तपासणी नियमित डोळे तपासणी डोळयांचा अंतर्गत दाब IOP तपासण्यासाठी टोनोमिटरचा उपयोग केला जातो विशिष्ट प्रकारे आय ड्रॉप चा वापर करुन तुमचा डोळा बधीर केला जातो आणि डोळयाच्या पृष्टभागाचा दाब तपासला जातो . काचबिंदु हा तुमच्या दृष्टीसाठी खुपच विघातक आहे. असामान्य व जास्तीचा नेत्रवलंबी दबाव IOP हा डोळयांमधील द्रव्याची मात्रा मधील समस्या दर्शवतो यावर डोळा हा खुप प्रमाणात द्रव्याची निर्मिती करतो किंवा त्याचा निचरा व्यवस्थित नसतो. सर्व साधारणपणे IOP हा २१ mmHq पेक्षा (मिलीमीटर ऑफ मरक्युरी) कमी असला पाहिजे मोजण्याचे एकक हे निश्चीत ठरवुन दिलेल्या क्षेत्रा मध्ये किती बळ कार्यप्रर्वरीत होते यावर ते अवलंबुन असते. जर तुमची IOP ही ३० mmHq पेक्षा जास्त असेल तर १५ किंवा त्यापेक्षा कमी IOP असणा-या व्क्तीपेक्षा तुमच्यामध्ये ४० पटीने अधिक काचबिंदुने दृष्टी नाश होण्याचा संभाव्य धोका असतो. त्यामुळे काचबिंदु उपचारांमधील आय ड्रॉप हे IOP कमी ठेवण्याच्या उद्देश् समोर ठेवुन बनविले जातात. काचंबिंदु नियंत्रणाची दुसऱ्या पद्धती मध्ये अत्याधुनिक प्रतिबिंबिंय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जसे की, सुक्ष्म विश्लेषण X-ray, ध्रवण मिती (SLP), ऑप्टीकल कोहरन्स टोमोग्राफी (OCT) आणि कॉनफोकल स्कॅनिंग लेझर ऑप्थॅल्मोस्कोपची प्रतिबिंबाची पायारेषा तयार करणे आणि डोळयांची दृष्टी चेता व अंर्तरचना यांची मोजणी करणे नंतर निर्देशित केलेल्या मध्यानावर जास्तीचे प्रतिबिंब आणि मोजणी घेतले जातात . व्हिज्‍युअल फिल्‍ड तपासणी काचबिंदुमुळे तुमच्या दृष्टीचे नुकसान होत आहे का हे पाहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांकडील व्हिज्युअल फिल्ड तपासणी हा एक मार्ग आहे. व्हिज्युअल फिल्ड तपासणीमध्ये मशीन मध्ये टक् लावुन सरळ पहाणे आणि बटण दाबल्यानंतर तुमच्या बाहयवर्ती दृष्टीमध्ये प्रकाशाची मिचमिच अनुभवास येते. व्हिज्युअल फिल्ड तपासणी ही पुन्हा पुन्हा केली जाते, काचबिंदुमुळे क्रमाक्रमाने होणाऱ्या नुकसानामध्ये कालांतराने काही बदल आढळतो की नाही हे पाहण्यासाठी गोनिओस्‍कोपी डोळयातील पाण्याचा निचरा सुरळीत होतो की नाही हे पाहण्यासाठी गोनिओस्कोपी केली जाते (डोळयाच्या आतील रचना ज्यामुळे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होतो व त्यायोगे नेत्रावलंबी दबाव वर प्रभाव पडतो.) गोनिओस्कोपी मध्ये बॉयोमायक्रोस्कोप बरोबर काही विशिष्ठ भिंगाचा वापर केला जातो. डॉक्टरांना निदान करण्यास सोपे जाते. अल्ट्रासाऊंड बायोमायक्रोस्कोपी ही पध्दत देखिल उपयुक्त आहे. उपचार तिव्रतेनुसार काचबिंदु उपचारामध्ये काचबिंदु शस्रक्रिया, क्ष् किरण किंवा औषधोपचार इ. चा समावेश होतो. काचबिंदु नियंत्रित करण्यासाठी प्रथमतः औषधांबरोबर आय ड्रॉप्स्चा वापर केला जातो, IOP कमी करण्यासाठी, काचबिंदु हा वेदना रहित असल्याने लोक आय ड्रॉप्सचा काटेकोरपणे वापर करण्याबाबत निष्काळजी राहतात व कायमस्वरुपी डोळयांचे नुकसान होण्यापासुन रोखण्यामध्ये अडथळे येतात.खरे पाहता काचबिंदुमुळे येणा-या अंधत्वाचे मुख्य कारण म्हणजे काचबिंदु औषधांच्या विहित पद़धतीप्रमाणे पुर्तता न करणे हे होय. काचबिंदु साठी वापरण्यात येणारे आय ड्रॉप्स जर असुखकारक व गैरसोयीचा वाटत असल्यास डॉक्टरांशी बोलुन त्याऐवजी दुसरा पर्यायी ड्रॉप्स घेतल्याशिवाय त्याचा वापर बंद करु नका.

 

नेत्रपटलाचे आजार (Retinal disease)

नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात. हे नेत्रपटल अतिरक्तदाब आणि मधूमेह या दोन आजारात खराब होते व त्यामुळे अंधुक दिसते. म्हणूनच या दोन्ही आजारात नियमितपणे नेत्रपटलांची तपासणी करावी लागते. यासाठी डॉक्टर फंडोस्कोप नावाचे बॅटरीसारखे एक छोटे यंत्र वापरतात.

 

1.नेत्रपटल सुटणे (Retinal detachment)
नेत्रपटल आपल्या जागेवरून सुटून डोळयामध्ये सरकण्याचा एक आजार असतो. याला आपण नेत्रपटल सुटणे असे म्हणूया. या आजाराची विविध कारणे आहेत. मुख्य लक्षण म्हणजे डोळयाच्या काही भागात अंधारी येणे व दृष्टीचे क्षेत्र कमी होणे. यावर लेझर शस्त्रक्रियेचा चांगला पर्याय आता उपलब्ध आहे. नेत्रतज्ज्ञांमध्ये आता नेत्रपटल-तज्ज्ञांची वेगळी शाखा विकसित झाली आहे. अपूर्ण वाढ झालेल्या नवजात बालकांमधील नेत्रपटलदोष अर्भकाच्या नेत्रपटलाची संपूर्ण वाढ होण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. आठ महिन्यांआधी जन्मास आलेल्या अर्भकाचे नेत्रपटल कमजोर असते. नेत्रपटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण झालेली असते. जन्मानंतर अपूर्ण वाढ झालेल्या रक्तवाहिन्यांची वाढ होताना ती दोषपूर्ण होते व दोषपूर्ण रक्तवाहिन्यांचे एक जाळे तयार होते. या सदोष रक्तवाहिन्या नेत्रपटलास नैसर्गिक रक्तपुरवठा करू शकत नाहीत व या रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे मागचा पडदा निसटू शकतो.

 

2.नेत्रपटलदोषाची कारणे
जन्मत: बाळाचे वजन कमी असणे (दीड किलोपेक्षा कमी) जन्मत:च इतर आजार असणे (फुप्फुसाचे आजार, इ.)

 

3.बाळाची नेत्रतपासणी कधी करावी?
प्रथमत: जन्माच्या दोन ते तीन आठवडयानंतर व तेव्हापासून पुढे रक्तवाहिन्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत नेत्रतज्ज्ञांकडून नेत्रपटलाची संपूर्ण तपासणी करावी.

 

4.उपचार
रक्तवाहिन्यांमधील दोषाचे प्रमाण कमी असेल तर हा दोष आपोआपच नाहीसा होतो. दोषाचे प्रमाण जास्त असेल तर सदोष रक्तवाहिन्यांची वाढ होऊ नये यासाठी लेसर उपचार करावा लागतो. लेसर उपचाराने पडदा निसटण्याची शक्यता कमी होते. दोषाचे प्रमाण जास्त असेल तर पडदा निसटतो व यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार करावा लागतो. परंतु शस्त्रक्रिया करूनही दृष्टी पूर्ववत होण्याची शक्यता कमी असते. उपचारानंतर पाठपुराव्याची गरज आहे का? उपचारानंतरही कधीकधी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी नेत्रपटलाची तपासणी होणे गरजेचे आहे.

 

आजाराचे दूरगामी परिणाम
चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता जास्त असते. कमजोर राहिलेला डोळा आळशी बनतो. तिरळेपणा दोषाचे प्रमाण जास्त असल्यास अंधत्वही येऊ शकते. उपचाराने अंधत्व येण्याची शक्यता कमी होते. परंतु ही शक्यता संपूर्णपणे टाळता येत नाही.

 

डायबेटिक रेटीनापथी (Diabetic retinopathy)

डायबेटिस पेशंटमध्ये बहुतांश वेळेस डायबेटिक रेटिनोपॅथी हा डोळ्यांचा विकार आढळतो. डायबेटिस पेशंटमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय आदी अवयवांवर होतो. खासकरून डोळ्यांच्या मागील पडद्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी अंधूक होते. त्यामुळे आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डायबेटिस जेवढा जास्त जुना तितका हा विकार जडण्याचा धोका अधिक असतो. पण हल्ली एक-दोन वर्षांपासून डायबेटिस असलेल्या पेशंटनाही हा विकार जडल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे डायबेटिस असणाऱ्यांमध्ये वयाच्या चाळिशीनंतर हा विकार संभवतो. यामध्ये डोळ्याच्या मागील पटलावरील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्त साकळल्याने डोळ्याचा पडदा अंधुक होतो. डोळ्याच्या पडद्याला सूज येऊन मधला भाग सुजतो. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे आजाराची लागण झाल्यावर सहा महिन्यांनी पेशंटला अंधूक दिसू लागते. त्याची कल्पना येण्यास उशीर झाल्याने दृष्टीचे नुकसान होते. त्यामुळे योग्य वेळीच चाचणी महत्त्वाची असते. या आजाराचे निदान करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. डायलेटेड फंडस एक्झामिनेशन ही चाचणी होते. यात डोळ्यांची एन्जिओग्राफी केली जाते. हातातील नसेमध्ये डायचे इंजेक्शन टोचले जाते. पंधरा ते वीस मिनिटात ही चाचणी होते. यामध्ये पडद्याची संपूर्ण प्रतिमाच स्पष्ट होते. यामुळे पडद्याला झालेले नेमके नुकसान दिसून येते. त्याचप्रमाणे ओसीटी ऑप्टकिल कोहिअरन्स टोमोग्राफी(ओसीटी) ही चाचणी केली जाते. यामध्ये डोळ्याच्या पडद्याचे संपूर्ण स्कॅनिंग केले जाते. यात डोळ्याला झालेली इजा कळून येते. तिरळेपणा (Squint) दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास ‘तिरळेपणा’ म्हणतात. तिरळेपणाबद्दल कमी माहिती असल्याने व अंधविश्वासामुळे मुलाच्या आयुष्याला कायमचे गालबोट लागते.

 

  • तिरळेपणावर वेळीच उपचार केल्यास, दृष्टीहीनता व तिरळेपणा दोन्हीवरही मात करता येऊ शकते.
  • जसजसे मुलाचे वय वाढत जाते तसतसे तिरळेपणावर उपचार करून दृष्टी परत मिळवणे अवघड होत जाते.
  • हा तिरळेपणा काही मुलांमध्ये कायमचा असतो तर काहींमध्ये तो मध्येच उद्भवणारा असू शकतो.
  •  हा दोष आतील, बाहेरील, वरील किंवा खालील कोणत्याही दिशेत असू शकतो.
  • तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही तर डोळा आळशी (Amblyopic) होण्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती दृष्टीहीनतेस कारणीभूत ठरू शकते.

तिरळेपणाची कारणे

आनुवंशिकता, असंतुलित स्नायुशक्ती व डोळयास होणारा कमी रक्तपुरवठा. मोतीबिंदुमुळे निर्माण होणारी पुसट प्रतिमा, बुबुळावरील व्रण, आंतरपटलाचे रोग,दृष्टीदोष, डोळयात गाठ असणे, इ. तिरळेपणाची लक्षणे एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळया दिशेने पाहणे. एका किंवा दोन्ही डोळयांमध्ये दृष्टीदोषतीव्र सूर्यप्रकाशात तिरळेपणा असणारी मुले डोळा मिटून घेतात. काही मुले चेहरा किंवा डोके एका ठरावीक दिशेत वाकवून वस्तुकडे बघण्याचा प्रयत्न करतात. दोन प्रतिमा दिसतात. कायमची दृष्टीहीनता येऊ नये यासाठी केले जाणारे उपचार दृष्टीदोषामुळे आलेला तिरळेपणा हा ठरावीक चष्म्याचा नंबर लावून घालवता येतो.सामान्य डोळयास पट्टी (पॅच) लावून आळशी झालेल्या डोळयाची नजर वाढवता येते. शस्त्रक्रिया समांतर कक्षात नसलेले डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणले जातात. शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन किंवा फक्त डोळयांस भूल देऊन केली जाते. शस्त्रक्रिया होणा-या मुलास सर्दी, ताप, खोकला, इ. सारखा आजार नसावा. शस्त्रक्रिया डोळयाच्या पांढ-या भागात केली जाते. शस्त्रक्रियेनंतर ५ ते ६ तास राहावे लागते.जरी शस्त्रक्रिया झाली असेल तरीही चष्मा वापरणे बंधनकारक आहे.बालवयातला तिरळेपणा एकतर जन्मजात असतो किंवा दृष्टीदोषामुळे तयार झालेला असतो. तिरळेपणा आढळला तर लवकरात लवकर नेत्रतज्ज्ञास दाखवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेने तिरळेपणावर उपाय करता येतो. दृष्टीदोष असल्यास त्यावरही उपाय करावे लागतात

 

आळशी डोळा (Amblyopia)

डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच आळशी डोळा. डोळा आळशी होण्याची कारणे तिरळेपणा दोन डोळयातील चष्म्याच्या नंबरमधील तफावत. जन्मजात मोतीबिंदू / पापणी पडणे आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याचा संभव जास्त असतो.डोळा आळशी का होतो?
जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूस पाठविल्या जातात. त्यामधील तिरळा असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो. त्वरित उपचार न केल्यास हा रोग, कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत नाही. या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक असतो. आळशी डोळयावर उपचार लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो. आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे.
1. रुग्णांस दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.
2. आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
3. सामान्य डोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस ‘डोळाबंद’ असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते.
4. पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांचा, पाठपुरावा हा नेत्रतज्ज्ञांकडून ठरावीक कालावधी नंतर होणे गरजेचे असते.
5. पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो.
6. लहान मुलांमध्ये सुरुवातीस थोडा काळच पॅचिंग केले जाते. नंतर चांगल्या परिणामांसाठी त्याचा कालावधी हळूहळू वाढवला जातो.
7. पॅच हा डोळयावर चेह-यालाच लावला जातो.
8. चष्मा वापरणा-या रुग्णांमध्येही हा पॅच चष्म्याला न लावता डोळयावरच लावला जातो.

 

रातांधळेपणा (Night Blindness)

डोळ्यांच्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे रातांधळेपणा. या आजाराच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकते. रातांधळेपणा म्हणजे रात्री न दिसणे. बऱ्याच लोकांना अंधार पडायला लागला, की भीती वाटते; कारण अंधार पडला, की त्यांचे डोळे काम करणे बंद करतात. म्हणजे त्यांना दिसत नाही. दिवसा ज्या व्यक्तीला व्यवस्थित दिसते, त्या व्यक्तीला रात्रीच्या अंधारात मात्र काहीच दिसत नाही किंवा अतिशय कमी दिसते. ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. पपईच्या किंवा सरकी (कापसाच्या) बियांवर पाय दिला, तर रातांधळेपणा येतो, अशी एक अंधश्रद्धा आहे; पण त्याचा आणि या आजाराचा कुठलाच संबंध नाही.

 

प्रमुख कारण :

डोळ्यांच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये वेगळी होण्याची क्रिया) होते. शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेल्या तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत. या रंगद्रव्याला ‘दृग्‍नीलारुण’ (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात. त्यासाठी जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची कमतरता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते. काय काळजी घ्याल : हा आजार होऊ नये; म्हणून रोजच्या आहारात ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळे आणि त्वचेवरही परिणाम होतो. प्राण्यांचे यकृत व माशांच्या यकृताचे तेल; तसेच हिरव्या पालेभाज्या या पदार्थांत ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. पपई, आंबा, लाल भोपळा, गाजर, शेवग्याची पाने व शेंगा यातही हे भरपूर प्रमाणात असते. प्रौढ स्त्री-पुरुषांना दररोज ६०० मायक्रोग्रॅम इतके, तर शिशूंना ३५० मायक्रोग्रॅम इतके जीवनसत्त्व गरजेचे असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नेत्रपटल कोरडे होणे, डोळ्यांत पांढुरके डाग दिसणे अशी लक्षणे दिसतात. उपचार न झाल्यास अंधत्वही येण्याची भीती असते. त्वचाही कोरडी पडते. केसगळती होते.

 

इकडेही लक्ष द्या : रेटिनाइटीस पिग्मेन्टोसामुळे देखील रातांधळेपणा येऊ शकतो. डोळ्यांच्या तपासणीत काहीही दोष न आढळणाऱ्या या विकृतीत रुग्ण आपली तक्रार बहुधा नाट्यमय रीतीने सांगतो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांत व जीवितास धोका असलेल्यांना अंधुक प्रकाशात सतत काम करावे लागणाऱ्या आघाडीवरील सैनिकांत ही सवय आढळते. रातांधळेपणा असलेल्या मोटार चालकाला पुढील दिव्यांच्या प्रखर उजेडात फक्त दोन-तीन मीटरपर्यंतचाच रस्ता दिसतो. याउलट दृष्टिदोष नसलेल्या चालकाला कित्येक मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ दिसतो. रातांधळेपणाच्या नेमक्या उलट दृष्टिदोषाला म्हणजे अंधुक प्रकाशात प्रखर प्रकाशापेक्षा चांगले दिसण्याला ‘दिवांधत्व’ म्हणतात. उपचाराने रातांधळेपणा ठीक होऊ शकतो. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास नेत्रतज्ज्ञाशी संपर्क साधावा व कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

 

लासरू – डोळयाला पाझर (Dacrocystitis)

डोळयांच्या नाकाकडच्या कोप-यांत दोन्ही पापण्यांच्या टोकांशी एकेक छिद्र असते. त्यातून हे अश्रू एका नलिकेमार्फत नाकात उतरतात. यामुळेच रडताना डोळयांबरोबरच नाकातूनही जास्त पाणी येते. काही आजारांत जंतुदोषामुळे हे छिद्र व नलिका बंद होते. यामुळे पाणी नाकात उतरण्याचा मार्ग बंद होऊन डोळयांत सारखे पाणी साठून राहते. यामुळे डोळे जास्त ओले दिसतात. या विकारासाठी तज्ज्ञांकडे पाठवावे. अश्रुनलिका उघडण्यासाठी या छिद्रातून एका बारीक पिचकारीतून स्वच्छ सलाईन दाबाने सोडतात. यामुळे अश्रूंचा रस्ता पूर्वीप्रमाणे मोकळा होतो. लक्षणे अश्रुपिशवीत जास्त प्रमाणात अश्रु साठून राहणे व पापण्या ओल्या होणे. नवजात अर्भकांमध्ये अश्रुवहननलिका बिघाडामुळे अश्रू हे अश्रुपिशवीतच साठून राहतात किंवा गालांवरून खाली ओघळतात. अश्रू साठवले गेल्यामुळे अश्रुपिशवीत जिवाणू संसर्ग होऊन चिकट पू तयार होतो व तोच अश्रुवहनात अडथळा ठरतो. मुलांमध्ये अश्रुपिशवीच्या ठिकाणी सूज येते व डोळे लाल होतात त्यामुळे अश्रुपिशवीस संसर्ग होतो. उपचार अश्रुपिशवी दिवसातून 4 ते 6 वेळा हलके चोळणे. यामुळे पू निघून जाण्यास मदत होते. हा उपचार 1 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये उपयोगी आहे. जर डोळे लाल झाले असतील व पू येत असेल तर औषधी थेंब घालावे. अश्रुवहननलिका ‘सिलिकॉन नलिका’ एक आठवडयासाठी घालून ठेऊन हा अडथळा दूर करता येतो. शस्त्रक्रिया औषधोपचाराचा उपयोग न झाल्यास पूर्ण भूल देऊन शस्त्रक्रिया करावी लागते. वेळीच औषधोपचार व नलिकेवर दाब देऊन केलेला उपचार शस्त्रक्रिया टाळू शकतो. उपचार न केल्यास उद्भवणारा धोका अश्रुपिशवीच्या ठिकाणी एक टणक गाठ निर्माण होऊ शकते व ती फुटून त्यातून पस बाहेर येऊ शकतो.